पुणे : देशातील स्थावर संपदा क्षेत्रात (रिअल इस्टेट) चालू वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत गुंतवणुकीमध्ये तब्बल ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक गुंतवणुकीत पुणे हे देशातील दुसरे महानगर ठरले आहे. जमीन खरेदी, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले विकास प्रकल्प, तयार कार्यालयीन जागा आणि व्यावसायिक जागा यांमध्ये झालेला भांडवलाचा ओघ या प्रमुख कारणांमुळे पुण्यातील रिअल इस्टेटमध्ये इक्विटी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे.
व्यावसायिक सेवा आणि गुंतवणूक संस्था ‘सीबीआरई’च्या ‘मार्केट मॉनिटर २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत - गुंतवणूक’ या अहवालात ही बाब समोर आली आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राने इक्विटी गुंतवणुकीत मोठी झेप घेतली असून, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण ४८ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. या कालावधीत देशभरात सुमारे ३१ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, असे अहवालात नमूद केले आहे. या तिमाहीत देशभरात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ४५ टक्के वाटा विकासकांचा असून, ३२ टक्के वाटा हा संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आहे.
‘पुण्यातील वाढती इक्विटी गुंतवणूक शहराच्या मजबूत पायाभूत तत्त्वांवर व स्थिर बाजारविश्वासावर आधारित आहे. क्रेडाई पुणे–सीआरई मॅट्रिक्स हौसिंग रिपोर्ट २०२५ नुसार, पुणे पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक यशस्वी निवासी बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. यामागे गृहखरेदीदारांचा प्रबळ प्रतिसाद, वेळेत पूर्ण होणारे प्रकल्प या घटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. सन २०२४ या वर्षात पुण्यात विक्रमी गृहविक्री झाली असून, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील घरांच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली. त्यामुळे पुणे हे देशातील; तसेच परदेशातील गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरत आहे. पुण्यातील रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी सातत्याने वाढवत आहे. मेट्रो कनेक्टिव्हिमुळे गुंतवणुकीचे आकर्षण दृढ झाले आहे,’ असे ‘क्रेडाई, पुणे’चे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले.






