‘सीडीआरफुटीची चौकशी करू’

महाराष्ट्र टाइम्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया यांच्याकडे असलेल्या कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) च्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणांशिवाय कोणालाही सीडीआर मिळवण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरात प्रकरणात सहभागी कोणालाही सोडले जाणार नाही. एसआयटी उत्तम काम करत असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील. खरातला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

demand for inquiry in cdr leak case

‘भोंदू अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया यांच्याकडे ‘कॉल डिटेल रिपोर्ट’ (सीडीआर) असेल तर तो कसा लीक झाला, कुणी लीक केला याचीही चौकशी होईल. कारण असा ‘सीडीआर’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणा वगळता कुणालाही नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘अशोक खरात प्रकरणाशी संबंधितांचा ‘सीडीआर’ आपल्याकडे असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. परंतु, असा ‘सीडीआर’ प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणा वगळता कुणालाही नाही. त्यामुळे त्याचीही चौकशी सरकार करेल. अशा संवेदनशील प्रकरणांत केवळ आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. कोण कोणाशी बोलले, कुणी कुणासोबत काय केले, या आधारावर गुन्हेगारी तपास यंत्रणांचे काम चालत नाही. सबळ पुरावे महत्त्वाचे ठरतात. खरात याने केलेल्या घाणेरड्या कृत्यांमध्ये जे सहभागी असतील, त्या कुणालाही आम्ही सोडणार नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘खरात प्रकरणात रोज नवीन माहिती पुढे येत आहे. ‘एसआयटी’ काय तपास करते हे रोज सांगता येणार नाही. परंतु, ही यंत्रणा उत्तम काम करीत असून, त्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा. खरात प्रकरणाची सगळी पाळेमुळे खोदल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. खरातचा विषय राजकारणापेक्षा मोठा असून, काही लोक त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, अशा राजकारणाला महत्त्व न देता सरकार काम करत राहील’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे कायद्यात जी तरतूद आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, असे रवींद्र एरंडे प्रकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले.

‘राज्य सरकारने भोंदू बाबांवर केलेल्या कारवाईबाबत साधू-संतांनी अभिनंदन (पान ४वर)