कोकणामध्ये असलेल्या कातळशिल्पांचा मर्यादित अभ्यास झालेला आहे. या कातळशिल्पांचे सांस्कृतिक आणि वारसा महत्त्व लक्षात घेता त्यांचे शास्त्रोक्त संशोधन आणि युनेस्को नामांकन प्रक्रियेला गती देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी, १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला.
बारसू-सोलगाव रिफायनरीच्या चर्चेच्या वेळी कोकणातील कातळशिल्पांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या परिसरात सुमारे २०० कातळशिल्पे आहेत, असे स्थानिकांनी सांगितले होते. युनेस्कोकडे प्राथमिक यादीमध्ये कातळशिल्पांची नोंदणी झाली आहे. या कातळशिल्पांचा योग्य अभ्यास, वारसा महत्त्व, पर्यावरणीय परिस्थितीचा परिणाम याबद्दल अधिक माहिती मिळणे अपेक्षित आहे. या दृष्टीने ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ची मदत होईल. २०२६ ते २०२९ या कालावधीत हे डेस्क कार्यरत राहणार असून त्याच्या मुंबई आणि रत्नागिरी शाखा असतील. मुंबई शाखा संशोधन व समन्वयाची जबाबदारी सांभाळेल.
‘ही कातळशिल्पे एकमेकांपासून वेगळी पाहता येणार नाहीत. त्यासाठी या समूहाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या डेस्कचा कातळशिल्पांसाठी विविधस्तरीय फायदा होईल,’ असे भारतीय विद्या अभ्यासक सायली पालांडे-दातार यांनी सांगितले. ‘यातील काही कातळशिल्पे खासगी जमिनीवर असून, या स्थानिकांसमोर खूप प्रश्न आहेत. हेप्रश्न सोडवण्यासाठी हा डेस्क मदत करू शकेल,’ असेही त्या म्हणाल्या.







