भुजबळ, हिंदुराव, आदिक इच्छुक

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स

राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक हे इच्छुक आहेत. विधानसभेचे सदस्य या जागेसाठी मतदान करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून आहे.

भुजबळ, हिंदुराव, आदिक इच्छुक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. त्याविषयीची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केली. सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी तिसऱ्यांदा मतदान होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , प्रमोद हिंदुराव , अविनाश आदिक इच्छुक असल्याचे कळते.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून या एका जागेसाठी मतदान करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून असून, हे अर्ज विधान भवन, मुंबई येथे विहित मुदतीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी नऊ जून रोजी दुपारी १२ वाजता विधान भवन येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. या जागेसाठी निवडणूक लढविली गेल्यास १८ जूनला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

या जागेसाठी आपला विचार व्हावा, अशी जाहीर भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती. ही भूमिका मांडताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे उदाहरणही दिले आहे. तर, अविनाश आदिक हे पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांचे दीर्घकाळापासून विश्वासू असलेल्या प्रमोद हिंदुराव यांनीही या जागेसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुनेत्रा आणि पार्थ पवार हे कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे.