Thane Station Development Still On Paper Metro And Waterway Efforts Falter
ठाणे स्थानकाचा विकास कागदावरच
Contributed by: ठाणे,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दिवा येथील ठाणे स्थानकाला मेट्रो आणि जलमार्गाची जोडणी देण्याचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने स्थानक परिसराच्या स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. सहा महिन्यांच्या मुदतीत आराखडा प्रसिद्ध करणे शक्य न झाल्याने ठाणे महापालिका प्रशासनाला एकत्रित विकास आराखड्याचा प्रस्ताव नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेसमोर पुन्हा मंजुरीसाठी सादर करावा लागत आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन स्थानकाच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास आणि विविध वाहतूक सुविधांची जोडणी याबाबतची प्रतीक्षा कायम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. स्थानकाभोवतालच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने गतवर्षी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या आराखड्यात स्थानक परिसरातील पायाभूत सुविधा आणि विविध वाहतूक प्रकल्पांचे एकत्रित नियोजन अपेक्षित आहे. मात्र, मेट्रो आणि जलमार्ग जोडणीचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने आराखड्याचे काम पुढे सरकू शकलेले नाही.ठाणे हायस्पीड रेल्वे स्थानकाला अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची जोडणी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिका क्रमांक १४ची जोडणी आणि जलमार्गाची सुविधाही नियोजित आहे. परंतु सर्व वाहतूक सुविधांचा समावेश असलेला एकत्रित विकास आराखडा निर्धारित वेळेत तयार करता आला नसल्याची माहिती नगररचना विभागाचे सहायक संचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे.