‘दितवा’च्या विध्वंसखुणा

महाराष्ट्र टाइम्स

चक्रीवादळ 'दितवा'ने श्रीलंकेत मोठे नुकसान केले आहे. भारताने मदतीचा हात पुढे केला असून हवाई दलाने साहित्य आणि जवान पाठवले आहेत. अनेक नागरिक बेपत्ता असून दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. श्रीलंकेतून वादळ पुढे सरकले असले तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जाणवत आहे. अभिनेता सुयश टिळकही श्रीलंकेत अडकला आहे.

‘दितवा’च्या विध्वंसखुणा
‘दितवा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार माजला असून, या संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत २१ टन मदत साहित्य, ८० हून अधिक एनडीआरएफ जवान आणि आठ टन उपकरणे पाठवली आहेत. या विनाशकारी वादळाने श्रीलंकेत पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले असून, १२० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. वादळामुळे श्रीलंकेतील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या चक्रीवादळाचा फटका दोन लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे श्रीलंकेत अडकलेला मराठी अभिनेता सुयश टिळक मायदेशी परतण्यासाठी हताश झाला आहे.

भारताने श्रीलंकेला मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन सागर बंधू’ला वेग दिला आहे. भारतीय हवाई दलाने शनिवारी २१ टन मदत साहित्य, ८० हून अधिक एनडीआरएफ जवान आणि आठ टन उपकरणे श्रीलंकेत पाठवली. ‘दितवा’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठे नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या वादळात १२० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. शनिवारी हे वादळ दक्षिण भारतीय किनारपट्टीवर धडकले.
श्रीलंकेत ‘दितवा’ चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. हवाई दलाने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘ऑपरेशन सागर बंधू’ला गती दिल्याचे म्हटले आहे. या वादळामुळे श्रीलंकेत मोठे नुकसान झाले असून, १२० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १३० जण अजूनही बेपत्ता आहेत. वादळामुळे दळणवळण व्यवस्था बाधित झाली आहे, त्यामुळे नुकसानीची नेमकी माहिती मिळण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ६१ हजार कुटुंबांतील दोन लाखांहून अधिक लोकांना या आपत्तीचा फटका बसला आहे.

मध्य प्रांतातील कँडी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मृतांचा आकडा ५० पेक्षा जास्त झाला होता. मात्र, सर्व नुकसानीची अधिकृत पडताळणी झालेली नाही, असे मदत अधिकाऱ्यांनी सांगितले. बदुल्ला जिल्ह्यात ४९ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ जण बेपत्ता असल्याची पुष्टी झाली आहे. तेथील मुख्य जिल्हा प्रशासक प्रभात अबेवर्देना यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे अनेक भागांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. नुवारा एलिया जिल्ह्यात ५० हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, गुरुवारपासून जिल्ह्यातील अनेक भागांतून कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे मुख्य प्रशासक तुषारी तेन्नाकून यांनी सांगितले.

वायव्य प्रांतातील कालोया भागात एक हृदयद्रावक घटना घडली. बसमध्ये अडकलेल्या सुमारे ६८ जणांची नौदलाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका केली. त्यांची बस पुरात वाहून गेली होती आणि पुलावर अडकली होती. श्रीलंकेच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण बसच्या छतावर २९ तास अडकून पडले होते.

हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक अथुला करुणानायके यांनी सांगितले की, ‘दितवा’ चक्रीवादळ श्रीलंकेतून बाहेर पडून भारतीय किनारपट्टीकडे जात असले तरी, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम काही कालावधीसाठी कायम राहील. मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे यामुळे परिस्थिती अजूनही गंभीर राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे श्रीलंकेत अडकलेला मराठी अभिनेता सुयश टिळक मायदेशी परतण्यासाठी हताश झाला आहे. श्रीलंकन एअरवेजने सर्व उड्डाणे रद्द केल्यामुळे तो २४ तासांपासून कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकला आहे. सुयशने सांगितले की, ‘मी माझ्या कंपनीतर्फे श्रीलंकेला ट्रिप घेऊन गेलो होतो. चक्रीवादळ ओसरल्यावर विमान कंपनीने सगळी विमाने रद्द केली. येथे असलेल्या भारतीय दूतावासाकडून आमच्या खाण्यापिण्याची आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता भारतात परतण्याचे वेध लागले आहेत.’