आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरून विधान परिषदेत रणकंदन माजले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून केंद्राकडूनही कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विरोधकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी ठरल्यावर अखेर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मध्यस्थी करावी लागली. तरीही समाधान न झाल्याने विरोधकांनी सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या घोषणा देत अखेर सभात्याग केला. दरम्यान, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गेले ११ वर्षे स्वतःच्या शेतीसाठी नुकसान भरपाई मागत असून ती मिळत नसल्याची कैफियत सभापतींपुढे मांडत यात लक्ष घालण्याची मागणी केली.
आमदार राजेश राठोड यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीविषयीचा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला होता. यावर, मकरंद जाधव पाटील यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने सतेज पाटील, शशिकांत शिंदे, अनिल परब यांनी केंद्राकडून आर्थिक मदत कधी मिळणार, असा प्रश्नांचा भडिमार केला. यात बावनकुळे यांनी हस्तक्षेप केला. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.





