सूर महती महोत्सवाला दिमाखात सुरुवात

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यात सूर महती महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर, रचना बोडस यांचे गायन आणि पं. विनायक तोरवी यांच्या कसदार गायनाने पुणेकरांची सायंकाळ संस्मरणीय ठरली. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित होते. कलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

सूर महती महोत्सवाला दिमाखात सुरुवात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

युवा वादक यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन, रचना बोडस यांचे सुश्राव्य गायन यांच्या गायनाने प्रारंभ अन् पं. विनायक तोरवी यांच्या कसदार गायनाने सूर महती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. युवा आणि ज्येष्ठ कलाकारांच्या सादरीकरणाने पुणेकरांची शनिवारची सायंकाळ संस्मरणीय ठरली.

सूर महती फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सूर महती महोत्सवा’ला शनिवारी सुरुवात झाली. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी इंदिरा विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार चेतन वाकलकर, डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, फाउंडेशनचे रवींद्र खांडेकर, मानसी खांडेकर, अतुल खांडेकर उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांच्या वादनाने झाली. ‘डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचा मी भक्त असून, त्यांच्या नावाने आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवात सादरीकरणाची संधी मी महत्त्वाची मानतो. त्यांच्या ‘तिलक कामोद’ रागातून मी तो राग शिकलो असे सांगून यज्ञेश यांनी ‘तिलक कामोद’ रागाची प्रस्तुती केली. मिश्र काफी रागातील स्वरचित रचनेने त्यांनी समारोप केला. त्यांना भरत कामत, पार्थ देशमुख, पार्थ कुलकर्णी यांनी साथसंगत केली. त्यानंतर पं. काशिनाथ बोडस आणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या अमेरिकास्थित रचना बोडस यांचे शास्त्रीय गायन झाले. वाचस्पती आणि दुर्गा या रागांतील पारंपरिक रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना प्रणव गुरव, लीलाधर चक्रदेव, सायली कुलकर्णी, चिन्मयी ओक यांनी साथसंगत केली.

महोत्सवाचा उत्तरार्ध ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने रंगला. त्यांनी ‘छायानट’ राग सादर केला. त्यांना भरत कामत, सुयोग कुंडलकर, दत्तात्रेय वेलणकर, धनंजय हेगडे यांनी समर्पक साथ केली. ‘उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि देशातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक डॉ. वीणा सहस्रबुद्धे या होत्या,’ अशी आठवण तोरवी यांनी सांगितली. स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.