आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एमआयएमने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निवडीसाठी नेमण्यात आलेल्या चार सदस्यीय समितीसमोर शंभरपेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. राज्यभरात पन्नासपेक्षा अधिक उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता एमआयएमच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
पक्षाला नगरपालिका आणि महापालिकेत मिळालेल्या यशानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत उमेदवार जाहीर करण्याबाबत संकेत दिले होते. यासाठी एमआयएम पक्षाचे नासेर सिद्दीकी, शारेक नक्षबंदी, शेख अहेमद आणि विकास एडके ही चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
या समितीने जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्याबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. सोमवारी सकाळपासून जलील यांच्या कार्यालयात विविध जिल्हा परिषदेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांनी समितीसमोर अर्ज दाखल केले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वाळूज, गंगापूर, कन्नडसह अन्य भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे, तसेच राज्यातील अन्य भागातूनही जिल्हा परिषदेच्या इच्छुकांनी एमआयएमच्या उमेदवार निवड समितीकडे उमेदवारीचा दावा दाखल केला आहे.





