तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेला प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन अडीच महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेवर निवडून आलेले सर्वपक्षीय नगरसेवक आता खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. प्रभागातील विविध समस्या, नागरिकांचे प्रश्न, अनधिकृत फेरीवाले तसेच विविध गैरकृत्यांविरोधात नगरसेवकांनी आवाज उठवतानाच महापालिका प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेतील विविध विभागांतील अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून होत असल्याने प्रशासनही आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत विजयी पताका फडकवल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आता प्रभागातील समस्या आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडून आलेले एकमेव नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न उपस्थित केला. या भागातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी पाणी आणि वीज व्यवस्थेचा प्रश्नही गंभीर असून याबाबत पालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप खुस्पे यांनी केला. येत्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दुसरीकडे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत कथित बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आता ठाणे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांविरोधात आवाज उठवला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या शेजारी अत्यंत अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थ विकले जात असून प्रशासनाकडून या विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पेंडसे यांनी केला.





