डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची वाढलेली गर्दी आणि अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर डोंबिवलीतही एकच स्वतंत्र रिक्षा स्टँड उभारण्याची मागणी भाजप जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता मळेकर यांनी केली आहे. याबाबत नुकतीच आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक अधिकारी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी तसेच रिक्षाचालक-मालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहतूक पोलिसांनी आठ दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मागील काही दिवसांपासून स्टँड सोडून रस्त्यावर रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाईचा धडाका सुरू होता. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांसह वाहतूक शाखेचे अधिकारी श्रीराम पाटील यांची भेट घेतली. यावेळी डोंबिवली शहरात पूर्वीपासून पूर्व आणि पश्चिम दिशेकडे असलेले रिक्षा स्टँडच आजही कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी प्रत्येक स्टँडवर पाच ते दहा रिक्षा उभ्या करण्याची परवानगी होती. त्याच ठिकाणी आता शंभर ते दीडशे रिक्षा उभ्या राहत असल्याचे सांगण्यात आले.





