डोंबिवलीत ९,१११ महिलांचे सामूहिक लेझीम

महाराष्ट्र टाइम्स

जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीत ९ हजार १११ महिलांनी सामूहिक लेझीम वादन सादर केले. यातून जागतिक विक्रमाची नोंद झाली. सांगली येथील जुना विक्रम मोडला गेला. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. लेझीम हे आपले पारंपरिक नृत्य असून ते जपणे महत्त्वाचे आहे. डोंबिवलीकरांनी या विक्रमाचे जल्लोषात स्वागत केले.

unique lezim exhibition by 9111 women in dombivli

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादन करत जागतिक विक्रमाची नोंद केली. या विक्रमामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या वतीने ८ मार्च या जागतिक महिला दिन ाचे औचित्य साधून डोंबिवली (पूर्व) येथील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात सामूहिक लेझीम वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी सांगली येथे ७,३३८ महिलांनी एकत्र येत सादर केलेल्या सामूहिक लेझीम वादनाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होती. हा विक्रम आता डोंबिवलीच्या नावावर झाल्याची घोषणा लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी केली. डोंबिवलीत सुमारे साडेपाच मिनिटांचे प्रात्यक्षिक सादर करत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासी रविंद्र चव्हाण यांनी वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि पदक स्वीकारले. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानताना लेझीम ही आपली पारंपरिक संस्कृती असून ती जपणे आणि टिकवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

लेझीम, योगा आणि ढोल-ताशांच्या गजरात डोंबिवलीकरांनी या विक्रमाचे जल्लोषात स्वागत केले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि सोहळा अनुभवण्यासाठी पहाटेपासूनच डोंबिवलीकर संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात उपस्थित होते.