स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने टॅक्सीचालकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. टिटवाळा ते पुणे प्रवासादरम्यान टॅक्सीचालकाने चाकूचा धाक दाखवल्याने घाबरलेल्या तरुणाने चालकाच्या गळ्यावर जोराने चाकू फिरवला. या हल्ल्यात टॅक्सीचालक नासीर अन्सारी याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आदर्श भालेराव याला अटक केली असून तो इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
आदर्श चार दिवसांपूर्वी आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुण्याला निघाला होता. प्रवासादरम्यान अन्सारीने अनेकांना फोन करून आर्थिक मदत मागितली, मात्र मदत न मिळाल्याने त्याने आदर्शला चाकू दाखवून धमकावले. प्रतिकार करताना आदर्शच्या हातातील चाकूमुळे हत्या झाली. घाबरलेल्या आदर्शने मृतदेह पुण्यातील गणेशखिंड परिसरात रस्त्याच्या कडेला सोडला आणि टॅक्सी घेऊन थेट टिटवाळ्यात आला. तिथे गोवेली परिसरात टॅक्सी सोडून पळून गेला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या टॅक्सीत रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्या गाडीच्या नंबरवरून चालकाचा शोध घेतला असता हत्येचा प्रकार समोर आला. त्यानंतर आदर्शला अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे विभाग तपास करत आहे.





