देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (इस्मा) वर्तवली आहे. या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन तीन कोटी २४ लाख टन होण्याचा अंदाज असून त्यापैकी एक कोटी १८ लाख टन महाराष्ट्रात, तर उत्तर प्रदेशमध्ये ९८ लाख ५० हजार टन उत्पादन होईल, असे ‘इस्मा’ने म्हटले आहे.
'इस्मा'ने देशातील साखर उत्पादनाचा चालू हंगामातील तिसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे मूल्यमापन करून हा अंदाज मांडण्यात आला आहे. ‘इस्मा’च्या अंदाजानुसार, देशात या हंगामात साखर उत्पादन तीन कोटी २४ लाख टन होईल. त्यातील ३१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल. यामुळे निव्वळ साखर उत्पादन दोन कोटी ९३ लाख टन असेल. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन १२ टक्के जास्त असेल. तोडणी झालेल्या उसाचे क्षेत्र आणि तोडणी राहिलेले क्षेत्र तसेच उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा यावरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘इस्मा’च्या ताज्या अंदाजानुसार साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशाला मागे टाकून पहिल्या स्थानी येईल. महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादन एक कोटी १८ लाख टन असेल. गेल्या हंगामात ते ९३ लाख ५१ हजार टन होते. उत्तर प्रदेशाचे साखर उत्पादन ९८ लाख ५० हजार टन अपेक्षित असून, ते गेल्या हंगामात एक कोटी एक लाख १६ हजार टन होते. कर्नाटकाचे साखर उत्पादन ६१ लाख चार हजार टन राहण्याचा अंदाज असून, ते गेल्या हंगामात ५४ लाख ८८ हजार टन होते.
यंदाच्या हंगामात ३१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात येणार आहे. देशांतर्गत साखरेची मागणी दोन कोटी ८३ लाख टन असून, सात लाख टन साखरेची निर्यात होणार आहे. चालू हंगाम संपताना साखरेचा अतिरिक्त साठा ५३ लाख टन असेल. राज्यात साखरेचे उत्पादन वाढले असले तरी चालू हंगामात महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये ऊस उत्पादन कमी झाले आहे. लांबलेला पावसाळा आणि रोगामुळे उसाचे उत्पादन कमी झाले आहे.








