State Level Wrestling Competition At Rameshwar Rui
रामेश्वर रुई येथे कुस्ती स्पर्धा
महाराष्ट्र टाइम्स•
लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत विजेत्या मल्लांना मोठी रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे दिली जातील. अनेक मान्यवर क्रीडापटू या स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर येथे आज, मंगळवारी राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विजेत्या मल्लांना १,२५,००० रुपये रोख, चांदीची गदा, मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. आमदार रमेश कराड यांनी क्रीडाप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार आहे. या सोहळ्याला ट्रिपल अर्जुन पुरस्कार विजेते नरसिंग यादव, हिंदकेसरी जगदीश कालीरमण, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम आणि विकी बनकर यांसारखे दिग्गज पैलवान उपस्थित राहणार आहेत. माजी सरपंच तुळशीराम कराड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेत द्वितीय क्रमांकासाठी १,००,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख पारितोषिके दिली जातील. याशिवाय, ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ आणि ८६ प्लस ते १२५ किलो या वजन गटांतील विजेत्या मल्लांनाही हजारो रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. प्रा. विलास कथुरे, डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. महेश थोरवे आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉ. वैभव वाघ यांच्यासह संपूर्ण संयोजन समितीने क्रीडाप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.