मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी एक हजार ४८४ विशेष गाड्या चालवणार आहे. यात ७४९ आरक्षित आणि ७३५ अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील मार्गांवर या गाड्या धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेने तब्बल एक हजार ४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, या विशेष गाड्यांमध्ये ७४९ आरक्षित आणि ७३५ अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. या गाड्यांमुळे मुंबई , पुणे, नाशिकसह राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या विशेष गाड्यांमुळे मुंबई/दौंड-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, नाशिक रोड-बडनेरा, हडपसर-हरंगुळ यांसारख्या राज्यातील मार्गांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच, मुंबई-बलिया, मुंबई-गोरखपूर, दौंड-कलबुर्गी आणि सोलापूर-कलबुर्गी/अनकापल्ली यांसारख्या राज्याबाहेरील मार्गांवरही या विशेष गाड्या धावतील. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेने गर्दीची शक्यता असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुविधाही वाढवल्या आहेत. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक , थांब्यांची माहिती आणि तिकीट बुकिंगची सविस्तर माहिती लवकरच रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर केली जाईल.