नागपुरातील मुलीचा जागतिक विक्रम

महाराष्ट्र टाइम्स

नागपूरच्या गोजिरी कोत्तावारने साबणाच्या फुग्यांना त्रिमितीय आकार देण्याचे अनोखे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी तिला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. जगातील सर्वात तरुण संशोधक म्हणून तिने विक्रम नोंदवला आहे. तिच्या वडिलांच्या संशोधनाच्या वारशामुळे हे यश मिळाले आहे. जर्मनी सरकारने या संशोधनाला पेटंट दिले आहे.

नागपुरातील मुलीचा जागतिक विक्रम
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

साबणाचा फेस तयार करून त्याचे गोल-गोल फुगे (बबल्स) आपण सर्वांनीच आपापल्या लहानपणी उडवले आहेत. बबल्स म्हणजे गोल आकाराचेच, हे समीकरणदेखील आपल्या सर्वांच्याच डोक्यात फिट्ट बसले आहे; पण नागपूरच्या अवघ्या तीनवर्षीय चिमुरडीने या बबल्सना चक्क त्रिमितीय (थ्रीडी) आणि वेगवेगळे भौमितिक आकार प्रदान केले आहेत. तिच्या या अनोख्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे; तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी जगातील सर्वांत तरुण संशोधक तिने अनोखा विक्रम नोंदवला आहे. अशा या वंडर गर्लचे नाव आहे, गोजिरी अजिंक्य कोत्तावार.

ती मनीषनगर येथील स्मॉल वंडर प्री-स्कूलमध्ये नर्सरीला आहे. लहान मुलांना साबणाचे बबल्स उडवायला खूप आवडतात. मात्र, सहसा हे बबल्स गोल आकाराचेच असतात. गोजिरीच्या या संशोधनामुळे या बबल्सला थ्रीडी स्वरूप प्राप्त झाले आहे. या संशोधनात एक खास आकाराचा बेस तयार करण्यात आला. या बेसच्या साहाय्याने हवेत बबल्स सोडल्यास ते गोल न राहता विज्ञानातील विविध थ्रीडी आकार धारण करतात. २० नोव्हेंबर २०२५ रोजी जर्मनी सरकारने या संशोधनाला अधिकृत पेटंट प्रदान केले. त्यानंतर ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ने गोजिरीची ‘यंगेस्ट इंटरनॅशनल पेटंट होल्डर’म्हणून अधिकृत नोंद केली आहे.

गोजिरीचे हे यश योगायोग नाही, तर तिला संशोधनाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या नावावर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत.