बोगस त्वचारोगतज्ज्ञांना वेसण कधी?

Contributed byअध्यक्ष,शहर शाखा अध्यक्ष|महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्रात २९०० पात्र त्वचारोगतज्ज्ञ असताना तेवढेच किंवा त्याहून अधिक अपात्र व्यक्ती उपचार करत आहेत. सुशिक्षित नागरिकही खात्री न करता उपचार घेतात आणि त्यांचे नुकसान होते. आयएडीव्हीएल संघटनेच्या मते, त्वचारोग, सौंदर्य उपचार आणि केस प्रत्यारोपण क्षेत्रात अनधिकृत व्यक्तींकडून उपचार केले जात आहेत. यामुळे रुग्णांचे गंभीर नुकसान होत आहे. यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे.

fake dermatologists the risk of unauthorized treatments

महाराष्ट्र राज्यात सुमारे २९०० पात्र त्वचारोगतज्ज्ञ आहेत व तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त अपात्र व्यक्ती स्वत: त्वचारोगतज्ज्ञ असल्याचे भासवून उपचार करीत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित नागरिकही कुठलीही खात्री करुन न घेता त्वचेचे उपचार घेतात व शेवटी त्यांचेच नुकसान होते. त्यामुळे नागरिकांनी सर्वप्रथम त्वचारोगतज्ज्ञांची पदवी बघून ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची आहे किंवा नाही, यात्री खात्री करुन घेणे सर्वदृष्टीने महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे एमडी-डर्मेटॉलॉजी, डीएनबी-स्कीन, डीव्हीडी, डीडीव्ही, एफसीपीएस अशा पदव्या या क्षेत्रातील शिक्षित-प्रशिक्षित डॉक्टरांच्या असतात आणि हे तपासूनच रुग्णांची उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असेही आयएडीव्हीएल संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय दामले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात बोगस त्वचारोगतज्ज्ञांचा विषय ऐरणीवर येत आहे. त्वचारोगतज्ज्ञ म्हणून जेवढे पात्र आहेत, तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त अपात्र असल्याचा आरोप खुद्द त्वचारोगतज्ज्ञांच्या संघटनेकडून होत आहे. त्यामुळे रोजच सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक आणि शरीराचे नुकसान होत आहे. त्यातच काही रुग्णांचे अतोनात, जीवघेणे आणि कायमस्वरुपी नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बोगस त्वचारोगतज्ज्ञांवर कारवाई होणार कधी, हा प्रश्न आहे.

बोगस त्वचारोगतज्ज्ञांना वेसण कधी?

बोगस त्वचारोगतज्ज्ञांना वेसण कधी?

'इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्ट्स, व्हेनिरिऑलॉजिस्ट्स अँड लेप्रोलॉजिस्ट्स' (आयएडीव्हीएल) ही भारतातील त्वचारोग तज्ज्ञांची सर्वांत मोठी व्यावसायिक संघटना असून, देशभरातील १७ हजारांहून अधिक पात्र त्वचारोग तज्ञ या संघटनेचे सदस्य आहेत. त्वचारोग शास्त्राचा विकास, सुरक्षित आणि वैज्ञानिक उपचार पद्धतींचा प्रसार, वैद्यकीय नैतिकता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचे संरक्षण हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अलीकडे त्वचारोग, सौंदर्य उपचार तसेच केस प्रत्यारोपण या क्षेत्रात त्वचारोग विषयातील औपचारिक शिक्षण-प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात उपचार केले जात आहेत.

त्वचारोग तज्ञांच्या मते लेसर उपचार, केमिकल पील, बोटॉक्स इंजेक्शन, फिलर्स, त्वचारोग शस्त्रक्रिया, डर्मेटोसर्जरी तसेच केस प्रत्यारोपण या सर्व प्रक्रिया वैद्यकीय प्रक्रियांमध्ये मोडतात. या उपचारांसाठी त्वचेची रचना, त्वचारोगांचे स्वरूप, केस आणि नखांचे आजार तसेच शरीरातील इतर आजारांचा त्वचेवर होणारा परिणाम याचे सखोल ज्ञान आवश्यक असते. तसेच उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतींचे तातडीने व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षणही आवश्यक असते आणि त्वचारोगतज्ज्ञ यात प्रशिक्षित असतात, याकडेही लक्ष वेधले जात आहे. मात्र अधिकृत शिक्षण-प्रशिक्षण नसलेल्या आणि त्वचारोग तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींकडून गुंतागुंतीचे तातडीने व्यवस्थापन न झाल्यास रुग्णांचे गंभीर नुकसान होऊ शकते; किंबहुना अशा गुंतागुंतीचे व्यवस्थापन न होण्याची शक्यता सर्वाधिक असते, याकडे संघटनेच्या वतीने लक्ष वेधण्यात येत आहे.

अलीकडे तर ब्युटी पार्लरमध्ये सर्रास अपात्र व्यक्तींकडून त्वचेशी संबंधित उपचार तसेच विविध उपचार प्रक्रिया केल्या जात आहेत. काही ठिकाणी ॲलोपॅथीच्याच दुसऱ्या शाखेतील डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत, तर दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरांकडूनही असे उपचार बिनदिक्कत केले जात आहेत. यामुळे गंभीर तसेच जीवघेणी गुंतागुंत निर्माण होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र गंभीर दुष्परिणाम झाल्यानंतर या बाबींकडे लक्ष वेधले जाते, असेही संघटनेचे म्हणणे आहे.