कवलापूर येथील ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये अटी-शर्तीचा भंग करून अंधश्रद्धेचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल सांगली ग्रामीण पोलिसांनी व्हिडिओ चित्रणाच्या आधारे चौघांवर गुन्हा दाखल केला. संशयित दिलीप सुधाकर भोरे (रा. विश्रामबाग), रावसाहेब वसंत वाघमारे (रा. सातारा), वक्ते डॉ. पॉल दिनाकरण , सॅम्युअल दिनाकरण (दोघे रा. चेन्नई, तमिळनाडू), सुजी (रा. मुंबई) व अनोळखी एक अशी त्यांची नावे आहेत.
१३ ते १५ मार्च या काळात ख्रिश्चन प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. डॉ. पॉल दिनाकरण हे वक्ते म्हणून उपस्थित होते. या सभेपूर्वी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे प्रशासनाकडे तक्रार केली होती. दिनाकरण हे वेगवेगळे चमत्कारिक दावे करीत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी अशी मागणी केली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेदेखील पोलिसांकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी १३ मार्च रोजी पहिल्या दिवशी प्रार्थना सभेचे चित्रीकरण केले. होप ऑफ ग्लोरी मिनिस्ट्री यांच्या वतीने महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल या कार्यक्रमात संशयित दिलीप भोरे, रावसाहेब वाघमारे, डॉ. दिनाकरण, सॅम्युअल दिनाकरण यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी एक अनोळखी पुरुष व सुजी नावाच्या महिलेला लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य करण्यास चिथावणी दिली. त्यामुळे या दोघांनी डॉ. पॉल अंकल आणि इवांजेलीन आंटी या दोघांनी तिला ‘ले हँड प्रे’ केल्यामुळे तिचा रक्ताचा आजार कमी झाल्याचे सांगितले; तसेच ‘ले हॅन्ड प्रे’मुळे पदवी परीक्षेला ९९ टक्के गुण मिळाल्याचे सांगून अंधश्रद्धेचा प्रचार व प्रसार केल्याचे दिसून आले.







