दररोज शेकडो क्लिंटल भाजी, फळे, धान्य येणाऱ्या जाधववाडी बाजारातील अस्वच्छता कायम असून, जागोजागी साचलेला कचरा आणि गुराढोरांचा मुक्त संचार सुरूच असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा बंदोबस्त कधी केला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वर्षानुवर्षे जाधववाडी बाजार परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य बघायला मिळते. विक्रीनंतर उरलेला आणि खराब झालेला भाजी-पाला, फळे बाजार परिसरात फेकून देण्यात येतात व फेकून दिलेला माल उचललाच जात नाही. त्यामुळे गाई, म्हशी, बकऱ्या या फेकून दिलेल्या भाजीपाल्यावर यथेच्छ ताव मारतात. साहजिकच बाजार परिसरात जिथे-तिथे जनावरे चरतानाचे ओंगळवाणे चित्र पाहायला मिळते. अशी स्थिती असतानाही बाजार परिसरात स्वच्छता काही होत नाही. स्वच्छताच होत नसल्याने व्यापारी, विक्रेते त्रस्त असून, बाजारात नियमित साफसफाई-स्वच्छता होणार तरी कधी, अशा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
कचरा जाळणे सुरूच
एकीकडे बाजार परिसरात साफसफाई होत नाही, तर दुसरीकडे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून हा कचरा सर्रास जाळला जातो. त्यामुळे संपूर्ण बाजार परिसरात धूर आणि प्रदूषणाला सामोरे जावे लागते, असाही आरोप व्यापाऱ्यांच्या वतीने केला जातो. या संदर्भात बाजार समितीकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जाधववाडी बाजार परिसरात पूर्वीपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून, अजूनही सुधारणा झाली नसल्याचे व्यापारी, विक्रेत्यांनी सांगितले. आठ दिवसांतून एकदाच कधी तरी पाणी येते. त्याचप्रमाणे पाण्याला प्रेशर नसल्याने बहुतेकांना पाणी मिळतच नाही. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जार, तर वापरण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागतात. हीच स्थिती वर्षानुवर्षे असल्याचे सांगण्यात आले.







