मागील दोन महिन्यापासून रखडलेली कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा अखेर सोमवारी घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सभागृह नेतेपद भाजपच्या वाट्याला आले असून भाजपचे नगरसेवक वरुण पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महापौर हर्षाली थविल यांनी केली. पहिल्याच स्थायी समितीवर दिग्गजांची वर्णी लागली आहे.
महापालिकेत शिवसेना, भाजप आणि मनसेची सत्ता असून शिवसेना ठाकरे गट विरोधी बाकांवर बसला आहे. संख्याबळानुसार शिव आघाडीच्या वाट्याला आठ, भाजपला सात, तर ठाकरे गटाला एक अशा १६ सदस्यांची स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. यात शीव आघाडीकडून गजानन पाटील, विकास म्हात्रे, जयवंत भोईर, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, महेश गायकवाड, विजया पोटे यांच्यासह मनसेच्या गणेश लांडगे यांची, भाजपकडून दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनीषा गायकवाड, उपेक्षा भोईर, मुकुंद पेडणेकर आणि नंदू म्हात्रे यांची तर ठाकरे गटाकडून विशाल गारवे यांची निवड करण्यात आली.
दिग्गजांची फौज स्थायी समितीत रुजू झाल्याने सभापतिपदासाठी रस्सीखेच रंगणार आहे. महायुतीत वाद नसल्याचा दावा भाजपने केल्याने हे पद भाजपला मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.



