पावडरने पैसे दुप्पट; उत्तरेतून दोघांना अटक

महाराष्ट्र टाइम्स

पावडर लावून नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. या दोघांनी कागदाला रसायन आणि पावडर लावून ५०० रुपयांची हुबेहूब नोट तयार करून दाखवली. त्यानंतर खेळण्यातील नोटा देऊन त्यांनी सात लाख रुपये घेतले आणि पळ काढला. पोलिसांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात जाऊन दोघांना पकडले.

पावडरने पैसे दुप्पट; उत्तरेतून दोघांना अटक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कागदाला पावडर लावून नोटा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवून हातचलाखीने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या बांगूरनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीतील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, गोरेगाव येथील व्यावसायिकाचे सात लाख रुपये घेऊन त्यांनी परराज्यात पळ काढला होता. या दोघांवर अशाप्रकारचे अन्य काही गुन्हे दाखल असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

व्यावसायिक ललन महतो यांची वसई येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाशेजारी राहणाऱ्या पवन आणि सर नावाच्या दोघांसोबत मैत्री झाली. या दोघांनी नोटा बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. नोटेच्या आकाराचा कागदाचा तुकडा घेत दोघांनी एक रसायन आणि पावडर त्यावर चोळली आणि ५०० रुपयांची हुबेहूब नोट तयार केली. ललन यांनी सात लाख या दोघांना दिले. मात्र त्याबदल्यात खेळण्यातील नोटा देऊन त्यांनी पोबारा केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वपोनि रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय सरोळकर आणि भदरगे यांच्या पथकाने तपास सुरू केला. खबऱ्यांचे नेटवर्क आणि तांत्रिक पुराव्यांआधारे फसवणूक करणारे हे बिहार आणि उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजले. पथकाने या राज्यांमध्ये जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रकाश कुमार गुप्ता आणि राजसिंह प्रसाद या दोघांना अटक केली. प्रकाश हा बिहारचा, तर राजसिंह हा उत्तर प्रदेश येथील आहे.