शारीरिक व्यंगावरून हिणवल्याने गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स

गावदेवी येथे एका महिलेला अपंग व्यक्तीला 'लंगडा' म्हणणे महागात पडले. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बारचालकाने विचारणा केल्यावर महिलेने चित्रीकरण करत अपंग बारचालकाला हिणवले आणि धमकी दिली. या घटनेमुळे कायद्याचा बडगा उगारला गेला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

woman arrested for calling disabled person lame

एका अपंग व्यक्तीला ‘लंगडा’ म्हणून हिणवणे गावदेवी येथील महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या अपंग व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध गावदेवी पोलिस ठाण्यात अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुलाभाई देसाई रोड परिसरात एक रेस्टॉरंट बार दिव्यांग व्यक्ती चालवते. बारशेजारील इमारतीमध्ये राहणारी महिला येथे येणाऱ्या ग्राहकांचे रेकॉर्डिंग करून रस्त्यावर दारू पीत असल्याच्या तक्रारी करत आहे. ग्राहकांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बारचालकाने सुरक्षारक्षक नेमले. ते बारबाहेर ग्राहकांना उभे राहण्यास मनाई करतात. तरीही, नागरिकांना बारबाहेर ग्राहकांचा कोणताही त्रास नसतानाही, ही महिला चित्रीकरण करीत असल्याने बारचालकाने तिच्याकडे विचारणा केली. यावर तिने त्यांचेही चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. तसेच अपंग बारचालकाला ‘लंगडा’ म्हणून हिणवले आणि धमकी दिली. त्याच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.