निलंबनास्त्र आज घेणार मागे

महाराष्ट्र टाइम्स

लोकसभेत शिस्तभंग करणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन आज मागे घेतले जाणार आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या बैठकीत यावर एकमत झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलेले हे खासदार आता पुन्हा सभागृहात दिसतील. प्रश्नोत्तराच्या तासानंतर निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल. या निर्णयामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत होईल.

suspension of mps in lok sabha to be revoked today

लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित केलेले काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यासह आठ खासदारांचे निलंबन आज, मंगळवारी रद्द केले जाणार असून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्द्यावर एकमत झाल्याचे संसदीय सूत्रांनी सांगितले.

सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि पीठासीन अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फेकल्याबद्दल काँग्रेसचे सात आणि माकपचे एक अशा आठ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबितांमध्ये पडोळे यांच्यासह काँग्रेसचे हिबी एडन, अमरिंदरसिंग राजा वारिंग, माणिकम टागोर, गुरजीतसिंग औजला, किरणकुमार रेड्डी, डीन कुरियाकोसे व माकपचे मदुराईचे खासदार एस. वेंकटेशन यांचा समावेश होता.

या आठही खासदारांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाठी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर एक प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी बिर्ला यांच्या दालनात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.