तोतया पोलिसांचा डॉलरवर डल्ला

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील पवई येथे तोतया पोलिसांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून साडेसात हजार डॉलरची रक्कम लुटली. कारवाईची भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डॉलर घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्याला संशय आल्याने प्रकार उघडकीस आला. तोतया पोलिसांना ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली.

तोतया पोलिसांचा डॉलरवर डल्ला
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबईतील पवई येथे तोतया पोलिसांनी साडेसात हजार डॉलरवर डल्ला मारला. रुपयांचे विविध देशांच्या चलनामध्ये रूपांतर करून देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवत ते ही रक्कम घेऊन पसार झाले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान शेख हा तरुण पवई येथील नवरंग फॉरेक्स या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीला आहे. भारतीय व परदेशी चलनाच्या विनिमयाचे काम या कंपनीमार्फत केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना चलन पोहोचवण्याचे काम सलमान आणि त्याचे सहकारी करतात. १४ मार्च रोजी कंपनीत एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने साडेसात हजार डॉलरची गरज असल्याचे सांगितले. पवई येथील समरसेट बिल्डिंग येथे घेऊन यायला सांगितले. या डॉलरचे साडेसहा लाख रुपये त्याच ठिकाणी देतो असे सांगण्यात आले.

ग्राहकाच्या मागणीनुसार सलमान आणि त्याचा सहकारी डॉलर घेऊन समरसेट इमारतीमध्ये गेले. सुरक्षारक्षकाला फ्लॅट क्रमांक विचारला असता, त्याने या क्रमांकाचा फ्लॅट नसल्याचे सांगितले. त्यामुळे सलमान आणि सहकाऱ्याला संशय आला. ते तेथून निघत असताच चौघांनी त्यांना ताब्यात घेत, रिक्षात बसवून पोलिस ठाण्यात चला असे सांगितले. बेकायदा व्यवसाय करीत असल्याचा आरोप करीत सर्व डॉलर ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना मध्येच उतरवून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. सलमान पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर ते तोतया पोलिस असल्याचे स्पष्ट झाले.