धावती लोकल न पकडण्याच्या सूचना कितीही वेळा दिल्या जात असल्या तरी फलाटावर पोहोचल्यावर समोरची लोकल सोडण्याचा मोह प्रवाशांना आवरत नाही. लोकल पकडण्याच्या नादात तोल गेल्याने महिला फलाटावर पडल्याची घटना नुकतीच घडली. मात्र रेल्वे आणि फलाट यांच्यामध्ये सापडण्यापूर्वीच ‘कमर्शियल क्लर्क कम तिकीट कलेक्टर’ (सीसीटीसी) जॉन पॉल यांनी जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवले.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीसीटीसी जॉन हे कुर्ला रेल्वे स्थानकात नियमित तिकीट तपासणी करत होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल फलाटावर आली. लोकल रवाना होत असतानाच बेबी भास्कर गायकर या ज्येष्ठ नागरिक महिलेने लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. लोकलने वेग घेताच महिलेचा तोल गेला आणि ती फलाटावर कोसळली.
हा संपूर्ण घटनाक्रम फलाटावर असलेल्या जॉन यांनी पाहताच क्षणाचाही विलंब न लावता पॉल यांनी महिलेच्या दिशेने धाव घेतली. फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळीत महिला पडण्यापूर्वीच तातडीने त्यांना मागे खेचले. धाडसी प्रयत्नात पॉल यांच्या खांद्याला किरकोळ लचक भरली.
घाबरलेल्या अवस्थेत बेबी भास्कर गायकर यांना तत्काळ तिकीट तपासणी कार्यालयात बसवून पाणी देण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित घरी पाठवण्यात आले. प्रसंगातून सावरताना भावूक झालेल्या गायकर यांनी जॉन आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. सीसीटीसी जॉन यांनी दाखवलेल्या धाडसाचे मध्य रेल्वेकडून कौतुक करण्यात आले आहे.







