भारतीय कृषी संशोधन संस्था , पुसा (नवी दिल्ली) यांनी विकसित केलेल्या मराठवाड्यात हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर उष्णता-सहनशील गहू वाण ३३८५ ने उल्लेखनीय व सातत्यपूर्ण उत्पादन देत शेतकऱ्यांसाठी नवी आशा निर्माण केली आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा (नवी दिल्ली) येथील शास्त्रज्ञ प्राचार्य व कार्यवाह (अनुवंशशास्त्र विभाग) डॉ. राजबीर यादव यांनी नुकतीच चाकुर तालुक्यातील सुगाव येथील शेतभेटीदरम्यान गहू वाण ३३८५ च्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी प्रगतशील शेतकरी एस. एस शिंदे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली होती. एस. एस शिंदे हे २०२५ सालचे भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा (नवी दिल्ली) यांचे ‘नवोन्मेषी शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांनी वैज्ञानिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि हवामान-प्रतिरोधक शेती पद्धतींची प्रभावी अंमलबजावणी करून प्रदेशात आदर्श निर्माण केला आहे. या शेतभेटीत के.व्ही.के शास्त्रज्ञ डॉ. संदीप देशमुख, तसेच प्रगतशील शेतकरी बाबासाहेब घाडगे उपस्थित होते.
पिकाची एकूण वाढ, कणसांची लांबी, दाण्यांची भर, तसेच अंतिम टप्प्यातील उष्णतेवरील सहनशक्ती यांचा सखोल आढावा घेण्यात आला. मराठवाड्याच्या कोरडवाहू व उष्ण हवामानात या वाणाने उच्च उत्पादन क्षमता आणि स्थैर्य सिद्ध केले असल्याचे डॉ. यादव यांनी नमूद केले. गहू वाण ३३८५ सध्या वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरण अंतर्गत नोंदणी प्रक्रियेत असून, त्याच्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे लवकरच अधिकृत मान्यता मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनवाढ, उत्पन्न स्थैर्य आणि हवामान-ताणाविरुद्धची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गहू वाण ३३८५ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.





