मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित येथील जवाहरलाल दर्डा विमानतळाच्या विकासाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात यवतमाळ विमानतळासाठी आर्थिक तरतूद केली आहे.
शहराचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी यवतमाळ-नागपूर मार्गावर भारी जवळ एमआयडीसीच्या ११४ हेक्टर जागेत विमानतळ तयार करण्यात आले. मात्र विमानतळाच्या विकासाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले. २००९ मध्ये हे विमानतळ विकासासाठी रिलायन्स कंपनीला एका कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आले. यवतमाळ-मुंबई विमानसेवा सुरु करण्याच्या चर्चा झाल्या. पण पुढे काहीच झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. रिलायन्स कंपनीबरोबरचा राज्य शासनाचा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर आता अर्थसंकल्पात विकासासाठी तरतूद केली.





