राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीसाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी येत्या काळात राज्यभरात १ हजार २०० किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग आणि ६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकासित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पादरम्यान केली. आगामी वर्षात ५० किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन २०२९ पर्यंत आणखी १६५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी यावेळी अर्थसंकल्पात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, सागरी सेतू आणि किनारा मार्ग यांबाबत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग ८ हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून त्या २२ हजार ८६२ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई मेट्रो मार्गिका-११ हा २३ हजार ४८७ कोटी रुपये किंमतीचा पूर्णत: भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग-२ या ५ हजार ५७५ कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.





