अंबड पोलिस ठाणे हद्दीतील उत्तमनगर परिसरातील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्तींवरील अर्धा किलोचांदीचे मुकुट चोरट्यांनी लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी ही धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
एकादशीनिमित्त शुक्रवारी सकाळी मंदिरात महाअभिषेक, पूजा पार पडली होती. पूजा आटोपल्यानंतर दुपारी एक ते चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधून मंदिरात प्रवेश केला आणि तीनही मूर्तींच्या माथ्यावरील चांदीचे मुकुट लंपास केले. दुपारनंतर मंदिर उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. हे मंदिर परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून, या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. चोरट्यांना तत्काळ अटक करून मुकुट जप्त करावेत, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. मंदिराचे अध्यक्ष प्रवीण गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे दीड लाख रुपये किमतीचे हे चांदीचे मुकुट असल्याचे गुरव यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत तपास सुरू केला आहे.







