जेजुरी येथील खंडोबा मंदिर व गडकोट परिसरात भेसळयुक्त भंडारा, भाविकांची सुरक्षितता, अतिक्रमण आणि तोतया पुजारी यांबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन श्री मार्तंड देवसंस्थान, पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाने समन्वय बैठक घेऊन आगामी महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासह भेसळयुक्त भंडार विक्री करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
प्रशासनाने गावातील सर्व व्यापाऱ्यांना भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री न करण्याचे आवाहन केले असून, पोलिस प्रशासनाने शुक्रवारी अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढली. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरू असून, पोलिस प्रशासन, नगर परिषद आणि देवसंस्थान यांच्या समन्वयातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
जेजुरी हे साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने येथे वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांत घडलेल्या विविध घटनांमुळे भाविक सुरक्षा, भेसळयुक्त भंडारा, अतिक्रमण, तोतया पुजारी आदी प्रश्न ऐरणीवर आले होते. यातून देवसंस्थान आणि गावाच्या नावाची बदनामी होत होती. अखेर सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुजारी संघटनांनीही या संदर्भात बैठक घेऊन येथील वंशपरंपरागत पुजारी, सेवेकरी यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच महाशिवरात्री यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र दर्शनरांग तयार करणे, रांगेतच पाणी, प्रसाद उपलब्ध करणे, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांसाठी सुविधा देण्याचे नियोजन देवसंस्थातर्फे करण्यात आले आहे.
गडावरील दोन्ही पायरी मार्ग प्रशस्त करण्यासह नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाकडून अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.







