‘बालभारती’चे मुखपृष्ठ बोलणार विद्यार्थ्यांशी!

Contributed byजितेंद्र तरटेेjitendra.tarte@timesofindia.com,शालेय शिक्षणमंत्री|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बालभारतीच्या पुस्तकांवरील ताई आणि दादा आता विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत. हे दोघे एआय मॉडेल म्हणून काम करतील. अलेक्साप्रमाणे ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. शिक्षणमंत्र्यांनी या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. यामुळे खेड्यापाड्यातील शाळाही तंत्रज्ञानाने जोडल्या जातील. शिक्षकांनाही अद्ययावत होण्याची गरज आहे.

ai will communicate with students through the cover of balbharati

नाशिक : गेल्या काही पिढ्यांपासून सर्वांना ज्ञात असणारे बालभारतीच्या मुखपृष्ठावरील ताई अन् दादा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलायला लागले तर...’ ही कल्पना तुम्हाला ऐकायला छान वाटते ना! पण आनंदाची गोष्ट म्हणजे, नवीन इयत्तेत गेल्यानंतर बालभारतीच्या पुस्तकातून शाळा मागे पडेपर्यंत तुमची संगत केलेले हे चित्र आता केवळ चित्र उरणार नाही, तर एआय असिस्टंट मॉडेल अलेक्साच्या धर्तीवर हे ताई आणि दादादेखील राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये एआय मॉडेल बनून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणार आहेत. याबाबत खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच माहिती दिली आहे. एका शैक्षणिक कार्यक्रमात शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी नवतंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

तंत्रज्ञानाच्या काळात खेड्यापाड्यातील शाळाही आता तंत्राने जोडल्या जात आहेत. विद्यार्थीही गतिशीलतेने तंत्रस्नेही होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या चौकस अन् चिकित्सक बुद्धीला खाद्य पुरविण्यासाठी शिक्षकांनीही अद्ययावत व्हावे. कारण शासन आता शाळांमध्ये बालभारतीच्या मुखपृष्ठावरील बहीण-भावाच्या चित्राचे अलेक्साच्या धर्तीवर एआय मॉडेल साकारून पाठविणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. या संकल्पित नवीन एआय मॉडेलचे नाव काय असेल, ते मराठीसह आणखी कोणत्या बोलीभाषांत संवाद साधू शकेल का, याबाबत तज्ज्ञांशी बोलून अंदाज घेतला जाईल. वेळोवेळी यात आवश्यक त्या सुधारणादेखील केल्या जातील. याचा अर्थ असाही नाही की, यासारखे एआय तंत्रज्ञान शिक्षकांच्या जागा घेऊ शकतील, पण आपली स्पर्धा तंत्रज्ञानाशी आहे, हे लक्षात घेऊन शिक्षकांनाही अद्ययावत व्हावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती ही संस्था १९६७ पासून सुरू आहे. या काळात मोठी भावंडे ही लहान भावंडांना शैक्षणिक मार्गदर्शन करतात, असे वातावरण घराघरांत होते. याच संकल्पनेचा समावेश बालभारतीच्या मुखपृष्ठावरील चित्र संकल्पनेत झाला. निसर्गाच्या सान्निध्यात वयाने थोडी मोठी असणारी बहीण आपल्या लहान भावाला बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील विषय समजावून सांगत असल्याची या चित्राची संकल्पना होती.

...असा आहे चित्राचा प्रवास

आजवर बालभारतीच्या स्थापनेपासून तीन पिढ्यांमध्ये या चित्राने बालभारती या नावाच्या बरोबरीने ओळख मिळविली आहे. २७ जानेवारी १९६७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्य कारकिर्दीत स्थापन झालेल्या या संस्थेची पुस्तके १९६८ पासून तयार होण्यास सुरुवात झाली. आठ भाषा व चौदा विषयांमध्ये बालभारती पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविते. या संस्थेचा चेहरा बनलेले ताई अन् दादा आता विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत.