संजय राऊतांची दिलगिरी

महाराष्ट्र टाइम्स

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याच्या आरोपप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मालेगाव न्यायालयात हजर राहून दिलगिरी व्यक्त केली. यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला. राऊत यांनी गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहारातील आरोपांवरून दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सभासद व शेतकऱ्यांची सत्य बाजू 'सामना' वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे मान्य केले.

संजय राऊतांची दिलगिरी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याच्या आरोपप्रकरणी शनिवारी (दि.२१) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर झाले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला.

राऊत यांनी ‘सामना’तून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहारात १७८ कोटींचा अपहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, शनिवारी न्यायालयात हजर राहण्यापूर्वी राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उबाठा सेनेचे तत्कालीन उपनेते अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण हे आरोप केले होते. मात्र, वस्तुस्थिती पाहता आपण ते आरोप मागे घेत असून, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच गिरणा कारखान्याचे सभासद व शेतकऱ्यांची सत्यबाजू सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे राऊत यांनी न्यायालयात मान्य केले. त्यानंतर भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, सुनील देवरे आदी नेते व राऊत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भुसे व राऊत हे न्यायालयात सोबतच गेले.

भुसे यांची भूमिका व खटला

मंत्री दादा भुसे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. ‘जर १७८ कोटी रुपये जमा झाले असते, तर कारखाना आपणच खरेदी केला नसता का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सुमारे दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचेच भागभांडवल जमा झाले असून, ती रक्कम बँक आरटीजीएसद्वारे संबंधित कंपनीत गुंतवली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भागधारकांना सर्व व्यवहाराची माहिती असल्याचाही त्यांनी दावा केला. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत मंत्री भुसे यांनी मालेगाव न्यायालयात ॲड. सुधीर अक्कर यांच्यामार्फत बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता.

गैरहजेरीमुळे दंड

१२ जानेवारी रोजी तक्रारदार मंत्री भुसे यांची साक्ष नोंदवण्यात आली. पुढील तारखेला उलटतपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, २२ जानेवारी रोजी सुनावणीदरम्यान खासदार राऊत व त्यांचे वकील गैरहजर राहिल्याने न्यायालयाने खासदार राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम साक्षीदार सुनील देवरे यांना खर्च म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

शनिवारची नाट्यमय घडामोड

न्यायालयीन सुनावणीस खासदार राऊत यानंी शनिवारी (दि.२१) न्यायालयात हजर होत स्पष्ट केले की, शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन उपनेते अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आरोप केले होते. मात्र, त्या माहितीत तथ्य नसल्याचे समजल्याने आपण सर्व आरोप मागे घेत असून, दिलगिरी व्यक्त करत आहोत. राऊत यांनी न्यायालयात तसेच माध्यमांशी बोलताना गिरणा कारखान्याचे सभासद व शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त करीत सभासदांची सत्य बाजू ‘सामना’त प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले.

अवसायनात निघालेल्या दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याची पंधरा वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित कंपनीने २७ कोटी १५ लाखाला हा कारखाना खरेदी केला आहे. हा विक्री व्यवहार होत असताना भुसे यांनी मालेगाव व आसपासच्या तालुक्यातील लोकांकडून काही भागभांडवल जमा केले होते. कारखाना खरेदी करण्याच्या नावाने हे भाग भांडवल जमा करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यातून कारखाना खरेदी न करता ते पैसे हडप केल्याचा आरोप राऊत यांनी बातमीच्या माध्यमातून भुसे यांच्यावर केला होता. लोकांकडून जमविलेले जवळपास १७८ कोटी रुपये भुसे यांनी हडप केल्याचा दावा राऊत यांनी केला होता.