महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१व्या नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे शनिवारी (दि. २१) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. ‘आश्रित’ या पहिल्या नाटकातून पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा व त्यांना मिळणारा प्रतिसाद या विषयावर भाष्य करण्यात आले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात २३ मार्चपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. संजय वराडे, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, सुनील चव्हाण, कुणाल घोटेकर, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांची उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वराडे म्हणाले की, ‘नाटकांतून कलावतांच्या भावना व वास्तव मांडले जाते. मेंदूच्या डाव्या बाजूने व्यावहारिक, तर उजव्या बाजूने भावनिक विचार केला जातो. सर्वसामान्यांपेक्षा कलावंतांचा उजव्या बाजूचा मेंदू अधिक सक्रिय असतो. डाव्या हाताच्या हालचाली वाढवल्यास मेंदूची उजवी बाजू सक्रिय होते.’
सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. कल्याण निरीक्षक महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण निरीक्षक शशिकांत पाटोळे यांनी आभार मानले. स्पर्धेचे परीक्षण सुनील सुळेकर, श्रिया जोशी व महेश डोकफोडे करीत आहेत.
आजचे नाटक : वो फिर नहीं आतें (संगमनेर)
नेहरूनगर येथील गांधीनगर वसाहत केंद्राच्या ‘आश्रित’ या नाटकाने स्पर्धेला प्रारंभ झाला. संगीता फुके-पवार लिखित व दिग्दर्शित या नाटकातून दोन पिढ्यांतील वैचारिक अंतरामुळे होणारे वाद व स्वाभिमानी पालकांचे चित्रण करण्यात आले. गोपाल जगताप, कांचन चौधरी, सोनाली निकम, प्रतीक्षा देशपांडे, तृप्ती गिरी, राजेंद्र आचारे, रेखा नरवाडे आदींच्या भूमिका होत्या. नेपथ्य प्रमोद सावळे, किशोर टोचे यांचे, संगीत महेंद्र पाटील, जतिन आहिरे यांचे होते.



