इयत्ता दहावीच्या परीक्षेला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली असताना उंटवाडी येथील मुलांचे निरीक्षण आणि बालगृहात वास्तव्यास असलेला निराधार विद्यार्थी बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गुरुवारी रात्री बालगृहातून निघालेल्या त्या विद्यार्थ्याने शुक्रवारी परीक्षा दिल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. मात्र, तो पुन्हा बालगृहात न परतल्याने याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडी येथील बालगृहात काही वर्षांपासून संबंधित निराधार मुलगा वास्तव्यास आहे. गुरुवारी (दि. १९) सायंकाळी पाच ते रात्री बारा या वेळेत खेळण्याच्या उद्देशाने बाहेर निघालेला संबंधित मुलगा परत आला नव्हता. त्यानुसार पोलिसांत प्राथमिक तक्रार देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि. २०) त्या विद्यार्थ्याची दहावीची परीक्षा असल्याने परीक्षा केंद्रालगत दुपारी चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या काही मित्रांनी त्याला बघितल्याचे सांगितले. त्यामुळे परीक्षा दिल्यानंतर पुन्हा तो विद्यार्थी गायब झाल्याचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असून, त्याच्या मित्रांकडेही चौकशी केली आहे. सोमवारी (दि. २३) पुन्हा संबंधित विद्यार्थ्याची परीक्षा असल्याने त्यावेळी परीक्षा केंद्रात उपस्थित राहिल्यास त्याला पुन्हा ताब्यात घेत समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या मुलाने यापूर्वीही अशाच प्रकारे संस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही तासांत तो परतलाही होता. त्यामुळे या घटनेमागे अपहरणापेक्षा मानसिक तणाव किंवा इतर कारण असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासह बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरातही पोलिसांनी शोधमोहीम राबविली आहे. ‘मुलाचा शोध घेण्यासाठी यंत्रणा काम करीत असून, लवकरच त्याला सुरक्षित परत आणण्यात येईल’, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.



