राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ३२५ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी १०० कोटींचा निधी राज्य सरकारने शासन निर्णयातून उपलब्ध केला आहे. यामुळे राज्यातील ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात थकीत वेतन वाढीचे हप्ते जमा होणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन वाढीबाबत एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर तोडगा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. थकीत वेतनवाढ समान टप्प्यात विभागणी करून त्याचा खर्च राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत थकीत वेतनाचे हप्ते देण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या पगारात थकीत हप्ता देण्यात आला नव्हता. त्यामुळे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी थकीत हप्त्याचा निधी महामंडळाकडे वळता करण्याची विनंती सरकारला केली. त्यानुसार अर्थ विभागाने १०० कोटींचा निधी महामंडळाला दिला आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त होण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.
सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. निधी प्राप्त झाल्यावर सोमवारपर्यंत वाढीव वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात येणार आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान थकीत वेतनासाठी आंदोलन पुकारलेल्या एसटीतील कामगार संघटनांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.



