पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला लागलेले विलंबाचे ग्रहण अखेर काही प्रमाणात दूर झाले असून राज्य कोट्यातील तिसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) सूचनेनुसार हा कार्यक्रम जाहीर केला असून, सोमवार, ९ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहेत.
देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या फेरीनंतर मोठ्या प्रमाणावर जागा वाढविण्याचे निर्णय घेण्यात आल्यामुळे तिसरी फेरी वारंवार पुढे ढकलली जात होती. परिणामी प्रवेश प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ९ फेब्रुवारी रोजी राज्य कोट्यातील उपलब्ध जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यानंतर १३ फेब्रुवारीला गुणवत्ता यादी जाहीर होईल, तर १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश पुष्टीकरण करावे लागणार आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीपासूनच विलंबाचा फटका बसला. पहिली फेरी नोव्हेंबरमध्ये पार पडली, तर दुसऱ्या फेरीसाठी तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, एनएमसीने विविध टप्प्यांत जागा वाढविल्याने राज्यस्तरीय वेळापत्रक पुन्हा बदलावे लागले. अखिल भारतीय कोट्यातील तिसरी फेरी सुरू झाल्यानंतरच राज्यानेही आपला कार्यक्रम निश्चित केला होता.









