Womens Rule In Municipalities Successful Unopposed Elections In Nashik Jalgaon And Dhule
राज्यातील बहुतांश महापालिकांवर ‘महिला राज’
Contributed by: टीम मटा|महाराष्ट्र टाइम्स•
राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. नाशिक, जळगाव आणि धुळे येथे महिला महापौर झाल्या आहेत. नाशिकमध्ये हिमगौरी आहेर-आडके, जळगावात दीपमाला काळे आणि धुळ्यात मायादेवी परदेशी यांनी महापौरपद भूषवले. या निवडीमुळे अनेक शहरांमध्ये महिलांचे वर्चस्व दिसून आले. महायुतीने जळगावात आपले वर्चस्व सिद्ध केले.
राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर, महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी नाशिक , जळगाव आणि धुळे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये महापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी अपेक्षित निकाल लागले असून, राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये महिला नगरसेविकांना 'प्रथम नागरिक' होण्याचा मान मिळाला आहे. नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी आडके, जळगावात भाजपच्या दीपमाला काळे आणि धुळ्यात भाजपच्या मायादेवी परदेशी महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
नाशिक महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकप्रतिनिधींचे राजवट सुरू झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांनी शहराच्या १७व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) विलास शिंदे यांनी उपमहापौरपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उपमहापौरपद त्यांना देण्यात आले. महापौरपदासाठी भाजपकडून आडके आणि उबाठा शिवसेनेकडून सीमा पवार यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, बिनविरोधाची परंपरा जपण्यासाठी उबाठा शिवसेनेला अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती मान्य करत पवार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी आडके यांची बिनविरोध निवड घोषित केली.जळगाव महापालिकेत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अपेक्षेप्रमाणे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी, तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी शुक्रवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर जळगाव शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत मोठा जल्लोष केला. महापौरपदासाठी काळे यांचा आणि उपमहापौरपदासाठी चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. अर्ज माघारीच्या मुदतीनंतरही हे दोन्ही अर्ज कायम राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
धुळे महापालिकेतही भाजपने आपली एकहाती सत्ता कायम राखली आहे. ५० नगरसेवकांसह पुन्हा एकदा बहुमत मिळवणाऱ्या भाजपने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत विरोधकांना धक्का दिला. शहराच्या ११व्या महापौर म्हणून मायादेवी परदेशी यांनी विजय मिळवला, तर ज्योत्स्ना पाटील यांनी उपमहापौरपदावर विजय मिळवला. यामुळे विरोधकांचे चमत्कार घडवण्याचे दावे फोल ठरले. परदेशी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या शहर विकास आघाडीच्या गीता नवले यांचा पराभव केला. पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भगवामय झालेल्या धुळे महापालिकेत पुन्हा एकदा 'भाजपा राज' सुरू झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.