Icc Warns Bangladesh Cricket Board Provide Immediate Information Regarding World Cup Participation
...अन्यथा स्पर्धेबाहेर काढू!
महाराष्ट्र टाइम्स•
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागाबाबत २१ जानेवारीपर्यंत निश्चित माहिती देण्यास सांगितले आहे. अन्यथा बांगलादेशऐवजी दुसऱ्या संघाला संधी दिली जाईल. बांगलादेशने सुरक्षा आणि सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत भारतात सामने खेळण्यास नकार दिला आहे. त्यांचे सामने श्रीलंकेत घेण्याची किंवा गट बदलण्याची मागणी आहे. आयसीसीने मात्र ऐनवेळी सामने हलवण्यास नकार दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी ) बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) इशारा दिला आहे की, जर त्यांनी २१ जानेवारीपर्यंत वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत सहभागाबाबत निश्चित माहिती दिली नाही, तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या संघाला संधी दिली जाईल. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत असलेल्या या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. आयपीएलमधून मुस्तफिझूर रहमानला वगळल्यामुळे नाराज झालेल्या बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिला आहे. यावर आयसीसी आणि बीसीबी यांच्यात चर्चा सुरू आहे, पण अद्याप तोडगा निघालेला नाही. आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले की, बांगलादेशने वेळेत निर्णय न घेतल्यास आयसीसी क्रमवारीनुसार दुसऱ्या संघाला स्पर्धेत प्रवेश मिळेल.
सुरक्षा आणि सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत बांगलादेशने वर्ल्ड कपमधील गट लढतींसाठी भारतात संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी, त्यांनी आपल्या लढती श्रीलंकेत घेण्याची किंवा गट बदलण्याची मागणी केली आहे. बांगलादेशचे तीन गट सामने कोलकाता आणि एक सामना मुंबईत होणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक ठरले असून तयारी अंतिम टप्प्यात असल्याने, ऐनवेळी बांगलादेशचे सामने भारतातून श्रीलंकेला हलवण्यास आयसीसीने नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामनाही श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन, आयसीसीने या संघांचे सामने २०२७ पर्यंत त्रयस्थ ठिकाणी घेण्याचे मान्य केले आहे. बांगलादेशात हिंदूंच्या हत्येनंतर दोन्ही देशांत राजकीय तणाव वाढला आहे.बांगलादेशचे माजी कर्णधार तमिम इक्बाल आणि सध्याचे कसोटी कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांनी वर्ल्ड कप सहभागाबाबत आडमुठेपणा करू नये, असे म्हटले आहे. त्यांच्या मते, सहभागाबाबत घेतलेल्या कठोर निर्णयाचा त्यांच्या क्रिकेट भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
जर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांना स्पर्धेतून निलंबित केले गेले, तर आयसीसी क्रमवारीनुसार स्कॉटलंड संघाला वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळेल. बांगलादेश 'क' गटात आहे, ज्यात इटली, इंग्लंड आणि नेपाळ यांचाही समावेश आहे.
मागील बैठकीत काय झाले? बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ढाका येथे बैठक घेतली होती. त्यावेळी बीसीबीने 'क' ऐवजी 'ब' गटात स्थान देण्याचा पर्याय सुचवला होता. 'ब' गटात यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. या गटात स्थान मिळाल्यास बांगलादेशचे सर्व गट सामने श्रीलंकेत होतील, अशी त्यांची अपेक्षा होती.
आयसीसीने बांगलादेशला स्पष्ट केले आहे की, "येत्या २१ जानेवारीपर्यंत सहभागाबाबत निश्चित माहिती द्या. अन्यथा वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत तुमच्याऐवजी दुसऱ्या संघाला संधी देऊ." हा इशारा बांगलादेश क्रिकेट बोर्डासाठी महत्त्वाचा आहे. स्पर्धेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याने, बांगलादेशच्या भूमिकेवर आता आयसीसीचे लक्ष लागले आहे.