दहा हजार कोटींची शहरात गुंतवणूक

महाराष्ट्र टाइम्स

तीन भारतीय उद्योजकांनी एकत्र येऊन 'एलएनके एनर्जी' नावाची नवीन कंपनी सुरू केली आहे. पुढील पाच वर्षांत १० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. छत्रपती संभाजीनगर येथे सोलर सेल आणि मोड्यूल प्लांट उभारला जाईल. प्रगत उत्पादन, हरित इंधन आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल. हा प्रकल्प महाराष्ट्रात शाश्वत विकासाला चालना देईल.

दहा हजार कोटींची शहरात गुंतवणूक
तीन भारतीय उद्योजकांनी मिळून ‘एलएनके एनर्जी’ (LNK Energy) नावाची एक नवीन स्वच्छ ऊर्जा कंपनी सुरू केली आहे. पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ही कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे सहा गिगावॉट क्षमतेचा सोलर सेल आणि मोड्यूल प्लांट उभारणार आहे. जागतिक आर्थिक परिषदेत या कंपनीची घोषणा करण्यात आली. ‘एलएनके एनर्जी’ प्रगत उत्पादन, हरित इंधन आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मिती या क्षेत्रांत काम करेल.

हा कंपनीचा पहिलाच प्रकल्प असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे ६० एकर जागेवर हे युनिट सुरू होईल. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उच्च क्षमतेचे सोलर सेल आणि मोड्यूल बनवणार आहे. या प्रकल्पासाठी ‘एलएनके एनर्जी’ने महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे.
कंपनीच्या सह-संस्थापकांनी सांगितले की, ही कंपनी भारतातील शाश्वत विकास , जबाबदार औद्योगिक वाढ आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेला प्रोत्साहन देईल. भविष्यात, ‘एलएनके एनर्जी’ जंक्शन बॉक्स, बॅटरी प्लॅटफॉर्म आणि ऊर्जा साठवणुकीचे घटक यांसारख्या वस्तूंचे उत्पादन करून देशांतर्गत स्वच्छ ऊर्जा परिसंस्था अधिक मजबूत करेल.

‘एलएनके एनर्जी’ जागतिक मानकांनुसार काम करेल आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनात एक नवीन दृष्टिकोन आणेल, असे परितोष लधानी यांनी सांगितले. या कंपनीमुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल.