याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी शिक्षण विभाग आणि सर्वशिक्षा अभियान अधिकाऱ्यांना संबंधित शाळेसंदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे. ‘गत वर्षी २५० वर्गखोल्या आम्ही बांधल्या. या वर्षीही ‘जिल्हा विकास निधी’मधून आम्हाला जास्तीत जास्त निधी आवश्यक तिथे शाळेतील खोल्या बांधण्यासाठी मिळणार आहे,’ असे रहमान यांनी सांगितले.
जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेतील गैरसोईंबाबत थेट उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेची दुरवस्था मांडली आहे. हे पत्र समाज माध्यमातून व्हायरल होत असून या पत्राने जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग प्रशासनाचा गैरकारभार समोर आणला आहे.
अंकिताने ‘अजितकाकां’ना लिहिलेल्या पत्रात गावच्या शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची दुरवस्था, वर्गात बसण्याची गैरसोय, शैक्षणिक साहित्याची वानवा अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे तिने नमूद केले आहे.
शाळेत केवळ कागदावर खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर इतर साहित्य दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. एकूणच शाळेच्या नावावर आलेली साहित्य आणी साधने मुलांना न वापरायला मिळता जातात कुठे हा प्रश्न या निमित्ताने या चिमुरडीने उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीने धाडसाने आवाज उठवून थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पत्राच्या माध्यमातून पोहोचवल्याने तिचे कौतुक होत असून, या प्रकरणातून ग्रामीण भागातील शाळांची वास्तविक स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे; पण याची दखल केव्हा घेतली जाते याबाबत उत्सुकता आहे.







