माजी आशियाई; तसेच राष्ट्रकुल क्रीडा विजेत्या राही सरनोबतने राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकताना दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या मनू भाकरला मागे टाकले. दरम्यान, दहा मीटर एअर रायफलमधील महिलांच्या स्पर्धेत साक्षी पाडेकर राष्ट्रीय विक्रमासह अव्वल आली.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेतीवर राहीने एकतर्फी हुकूमत राखली. तिने ४३ गुणांची कमाई करीत अव्वल क्रमांक मिळवला. तिने दुसरी आलेल्या विभूती भाटियास (हरियाणा - ३५) तब्बल आठ गुणांनी मागे टाकले. मनू भाकर ३१ गुणांसह तिसरी आली. प्राथमिक फेरीत मनू ५८९ गुणांसह अव्वल होती, तर राही ५७८ गुणांसह चौथी होती; मात्र राहीने पदक निश्चित करणाऱ्या फेरीत कामगिरी उंचावण्यात यश मिळवले. राज्यातील नेमबाज दहा मीटर एअर रायफलच्या चाचणीत लक्षवेधक कामगिरी केली. साक्षीने प्राथमिक फेरीतील वर्चस्व अंतिम फेरीतही कायम राखले. प्राथमिक फेरीतील ६३४.४ गुणांच्या कामगिरीनंतर तिने अंतिम टप्प्यात २५४.३ गुणांचा वेध घेत बाजी मारली.









