‘लवचीक’ ‘राज’कारण

महाराष्ट्र टाइम्स

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने 'लवचीक राजकारणा'ची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या लवचीक भूमिकेचे उदाहरण दिले. याउलट, उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. त्यांनी पैशांचा वापर आणि गद्दारीवर भाष्य केले. दोन व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्रावर घाव घातला जात असल्याची टीका त्यांनी केली.

‘लवचीक’ ‘राज’कारण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याच्या राजकारणावर महाराष्ट्रभर चर्चा सुरू असतानाच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ‘लवचीक राजकारणा’चा पवित्रा जाहीर केला. त्यानंतरही शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच राज यांनी पुन्हा त्याचा पुनरुच्चार केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र, भाजप व शिवसेनेचा कट्टर विरोध जाहीर करीत, आपली भूमिका स्पष्टपणे अधोरेखित केली.

‘केडीएमसी'मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती म्हणून शिवसेनेने मनसेच्या नगरसेवकांचे समर्थन मिळवले. यावरून मनसेच्या बदलत्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी राज ठाकरे यांनी पोस्ट लिहिली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने शीव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निमंत्रित राज यांनी उद्धव यांच्यासमोरच त्याचे वाचन केले. ‘राजकारणात कधी तरी बाळासाहेब ठाकरेंना पण लवचीक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचे मराठी माणसावरचे प्रेम तसूभर पण कमी झाले नाही. उलट ते अधिकच दृढ होत गेले. हेच संस्कार आमच्यावर आहेत. आरपार बदललेल्या राजकारणात कधी तरी थोडी लवचीक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल’, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी राज यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेवरही भाष्य केले. ‘बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी पाहण्यास मिळणार नाही, हे जितके खरे आहे, तितकेच बाळासाहेबांसारखे राजकारण करणे यापुढे कोणालाच जमणार नाही. पण, त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणे बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू, हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे’, अशी ग्वाही राज यांनी पोस्टमध्ये दिली आहे. ‘बाळासाहेबांच्या काळात अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचे अप्रूप नव्हते; पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचे समाधान मात्र त्यांना मिळाले. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा’, असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

राज यांच्या भाषणानंतर उद्धव यांनी मात्र, भाजप व शिवसेनेला तिखट लक्ष्य केले. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पैशांचा प्रचंड वापर झाला. बंद दरावाजाच्या फटीतून पैशांची पाकिटे टाकली जात होती. असे करून तुम्ही मत विकत घ्याल, पण मन कस विकत घेणार,’ असा सवाल करीत उद्धव यांनी भाजप व शिवसेनेकडे बोट दाखवले. ‘महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा गद्दारी हा आपल्याला लागलेला शाप असल्याची उदाहरणे दिसतात. गद्दारी आत्ताच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आली आहे. तो आपल्याला शापच आहे. जेव्हा विजय अशक्य असतो, तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर आजपर्यंत भगव्याशी झाली नसती, तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता,’ असेही उद्धव म्हणाले. यावेळी त्यांनी खाणीचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांनी कसे जंगलातील झाड तोडले त्याचा किस्सा सांगितला. ‘ज्या कुऱ्हाडीचा घाव आपल्याला बसतोय, त्या कुऱ्हाडीचा दांडा आपलाच आहे, याचे त्या झाडाला सर्वाधिक वाईट वाटले. आज आपल्यावरही आपलेच दांडे घाव घालण्यासाठी वापरण्याचे काम दोन व्यापारी करत आहेत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहा यांचा नामोल्लेख टाळून केली.