प्राणिक आरोग्यम फाउंडेशन यांच्या माध्यमातून होळी सणाच्या निमित्ताने रविवारी मुरबाड तालुक्यातील माळ परिसरातील आदिवासी पाड्यांमधील ६५ निराधार आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
संस्थेचा हा उपक्रम १० ऑक्टोबर, २०१६पासून सुरू असून साधारण दर दोन महिन्यांनी नियमितपणे गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले जाते. मुरबाड तालुक्यातील दीडशेहून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. दुर्गम भागात जाऊन स्वयंसेवक प्रत्यक्ष पाहणी करतात व खऱ्या गरजूंना मदत उपलब्ध करून देतात. आतापर्यंत हजारहून अधिक कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. अन्नधान्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचेही वितरण करण्यात येते. सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबांच्या घरात चूल पेटावी व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या सर्वेक्षणाच्या बळावरच हे कार्य उभे राहत आहे. प्रत्येक लाभार्थीची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून, खात्री करूनच मदत दिली जाते. स्वयंसेवकांच्या निष्ठा आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळेच हा उपक्रम नियमितपणे आणि यशस्वीपणे सुरू आहे,’ असे संस्थेचे विश्वस्त विराज घरत यांनी सांगितले.




