नदीतील कचऱ्याविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

Contributed byविद्यार्थी प्रतिनिधी,कुलसचिव|महाराष्ट्र टाइम्स

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीत कचरा टाकून तो जाळल्याने एमआयटी एटीडी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्रास झाला. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण आणि डोळ्यांची जळजळ झाली. काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी नदीतील कचरा त्वरित बंद करण्याची मागणी करत आंदोलन केले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या अडवल्या.

नदीतील कचऱ्याविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करावा, या मागणीसाठी एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एटीडी) शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली.

लोणी काळभोर येथील नदीपात्रात दोन मार्च रोजी कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार घडला. कचरा जाळल्याने परिसरात धुराचे लोट पसरून प्रदूषण झाले व नदीच्या कडेला असलेले एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय व एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करावा लागला. विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास; तसेच डोळ्यांची जळजळ झाली. काही विद्यार्थ्यांना विषारी धुरामुळे शुक्रवारी मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागले होते. या वेळी सर्वांनी या विषयाची गंभीरता, भविष्यातील संभाव्य धोके, मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, परिसरातील पर्यावरणाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता पाहून विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी प्रवेश द्वारासमोर बुधवारी सकाळी तीव्र आंदोलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या अडवल्या. लोणी काळभोर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले.