मागील काही वर्षांत रक्तदान ाच्या संदर्भातील जाणीवजागृती वाढली असली तरीही वर्षातील काही ठराविक दिवसांमध्ये मुंबईसह राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवतो. सर्वसामान्यांच्या मनामध्ये आजही रक्तदानाबद्दल काही समज-गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने कलेचे बोट हाती धरले आहे. विविध कलात्मक चित्रे, पोस्टर तसेच, रेखाटनांच्या माध्यमातून रक्तदान करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
कलेच्या माध्यमातून आपल्याला हवा असलेला संदेश अतिशय नेमकेपणाने देता येतो. त्याचा दीर्घकाळ सकारात्मक परिणाम समाजमनावर होतो. रक्तदानाचे नेमके महत्त्व काय आहे, हे चित्ररेखाटनांच्या माध्यमातून समाजावून सांगण्यासाठी ही दृश्यकला महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये तसेच, रक्तपेढीमध्ये एक विशेष कलादालन उभारून ही चित्रे लावण्यात यावीत, अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी दिल्या आहेत. रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या दात्यांना प्रोत्साहन मिळेल, रक्तदानाचे महत्त्व ठसण्यास मदत होईल, या उद्देशाने रक्त संक्रमण परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘धर्माच्या नावावर कशाला रक्ताचा सडा, हेच रक्तदान करून उपयोगी पडा’, ‘हिंदु, मुस्लीम, शिख, इसाई, सबको खून जरुरी है भाई’ या घोषवाक्यांना कल्पकतेने काढलेल्या चित्रांची जोड आहे. येथे वैद्यकीय सल्ल्यासाठी येणारे क्षणभर थांबतील, चित्रे पाहतील आणि रक्तदानाच्या संदर्भात विचारणा करतील, असा विश्वास परिषदेस वाटतो.




