डॉ. श्रीवास्तव, जाधव यांचा गौरव

महाराष्ट्र टाइम्स

महात्मा गांधी मिशन, एमजीएम विद्यापीठ आणि एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या वतीने 'सक्षमा' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'इस्रो'च्या शास्त्रज्ञ डॉ. वंदिता श्रीवास्तव आणि पॅराऑलिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव यांना हा सन्मान मिळाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यात मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारार्थींनी आपले अनुभव सांगितले.

डॉ. श्रीवास्तव, जाधव यांचा गौरव
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी मिशन, एमजीएम विद्यापीठ व एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या वतीने दिला जाणारा सक्षमा पुरस्कार सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ डॉ. वंदिता श्रीवास्तव आणि पॅराऑलिम्पिक खेळाडू भाग्यश्री जाधव यांना प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा ‘सक्षमा’ सन्मानाने गौरव करण्यात येतो. या वर्षीचा ‘सक्षमा’ पुरस्कार प्रदान समारंभ रुक्मिणी सभागृहात पार पडला. शशिकला बोराडे, अनुराधा कदम, शोभाताई कक्कड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. अपर्णा कक्कड, रचना सपकाळ, डॉ. प्राप्ती देशमुख यांची उपस्थिती होती.

या वेळी कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, ‘देशभरात विविध पदांवर सर्वच क्षेत्रांत महिला उत्तम आणि प्रतिभासंपन्नतेने कार्य करीत आहेत. विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त तयार केलेल्या एमजीएम संवाद या अंकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. संजना खंडारे आणि अदिती शर्मा यांनी डॉ. श्रीवास्तव , जाधव यांची मुलाखत घेतली. अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यशश्री मुळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा.अर्चना हारके यांनी आभार मानले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व ५० हजार रोख रक्कम देऊन पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येते.

या वेळी डॉ. श्रीवास्तव म्हणाल्या, ‘मी शाळेत असतानाच ठरवले होते, की मला भौतिकशास्त्रात शिक्षण घ्यायचे आहे. दूरदृष्टी, मेहनत, दृढनिश्चय, शिस्त आणि इच्छाशक्ती ठेवली, तर कोणीही यशस्वी होऊ शकतो. आपली आवड जोपासून त्यात कौशल्य वाढवत आत्मविश्वासाने जीवनात पुढे जायला हवे. जाधव म्हणाल्या, ‘मी माझ्यासारख्या इतर दिव्यांग खेळाडूंना पाहून स्वत: परिस्थिती स्वीकारली. मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचले आहे. नांदेड येथील माध्यमांनी आणि डॉक्टरांनी माझ्या प्रवासात खूप मोठी भूमिका निभावली आहे. आयुष्यात खचून जमणार नाही. हिंमत न हारता मेहनत करीत पुढे जायला हवे. सुरुवातीला सर्वांच्या आयुष्यात संघर्ष असतो. मात्र, पुढे जाण्याची ताकद ठेवली, तर आयुष्यात आपण यशस्वी होतो.