राऊळगाव येथील एसबीएल कंपनीतील भीषण स्फोट प्रकरणात फरार असलेल्या कंपनीच्या संचालक मंडळातील सत्यवती पाराशरसह ११पैकी सहा आरोपींनी अटक टाळण्यासाठी दाखल केलेल अटकपूर्व जामीनअर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावलेत.
१ मार्च रोजी कंपनीत हा स्फोट झाला. याबाबत कळताच संचालक आलोक चौधरी व संजय चौधरी (दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड) यांच्यासह ११ आरोपी निवासस्थानांसह विविध ठिकाणाहून पसार झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. फरार आरोपींचा महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये शोध घेण्यात येत आहे. ग्रामीण पोलिस पथक या तीन ठिकाणी तळ ठोकून आहेत. घटनेच्या नऊ दिवसानंतरही या प्रकरणात पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही.
दरम्यान, कंपनीतील स्फोटात मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हा आकडा आता २५ झाला आहे. फरार असलेल्या ११पैकी अलोक अवधिया, अरविंद पाचपुत्रे, श्रवण कुमार, रवींद्र पोखर्णा, मनोज कुमार प्रसाद आणि सत्यवती पाराशर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. बचावपक्षाचा युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाला. यात आरोपींकडून ॲड. प्रकाश जयस्वाल, ॲड. प्रफुल्ल मोहगावकर आदींनी बाजू मांडली. पोलिसांनी या प्रकरणी आपले लेखी उत्तर सादर केले असून आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला आहे.
पाराशर हा संचालकांपैकी एक असून त्याने कर्तव्यात आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडत कर्तव्यात कसूर केल्याने हा स्फोट झाला व कर्मचारी मृत्युमुखी पडले. तसेच इतरांच्याही चुकांमुळे हा स्फोट झाल्याने त्यांना जामीन मंजूर करू नये अशी मागणी पोलिसांनी केली होती. जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे आणि सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी सरकारकडून युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून सर्व आरोपींचे जामीनअर्ज फेटाळून लावले.




