भरधाव मालवाहू जीप उलटल्याने १९ श्रमिक जखमी झाले. ही घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोवाड येथील वर्धा नदीजवळ सोमवारी सकाळी घडली. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपुरातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इंदू नितीन फाटे (३७), बबिता मनीराम चंगरी (३२), सरिता सत्तुलाल परतेती (२५), शर्मिला बळगू कुमरे (१८), सरस्वती कुमरे (२४), फुलवंती जीवन सरयाम (६०), बाली ऊर्फ सविता जोहरी कुमरे (३५), शारदा शेशराव कुमरे (१६), मंगूबाई गणेश उइके (५०), मनोज नीळकंठराव दवंडे (३५, रा. इसमरी, ता. वरुड जि. अमरावती), अनिकेत ऊर्फ विजय बाबाराव दवंडे (२४), हेमराज राजारामजी कुमरे (३५), सुनिल काशीरामजी इवनाती (४५), सुलाप सीताराम मसराम (३३, रा. सोनपठार), सुशील मनीराम सरयाम (१८, रा. वरुड), फागुलाल चंदन सरयाम (४०), राकेश केशवरावजी इवनाती (३७), चिंटू तेरमु भोरसुंडा (३५), राहुल जीवन सरयाम (१७), मंगलू जीवन सरयाम (२०), विनोद सुभाष कुळसंगे (३५), सामबती सनीराम सरयाम (६०), विजय अरुण निस्वादे (२४), शंकर चैतराम मरसकोल्हे (४०) अशी जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील श्रमिक एमएच-२७-एक्स-७७३९ या क्रमांकाच्या मालवाहू जीपने बेलोनाकडे जात होते. विजय निसवाडे हा जीप चालवित होता. जीपमध्ये २६ श्रमिक दाटीवाटीने बसले होते. दरम्यान, चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. जीप उलटली. यात नऊ महिलांसह २६ श्रमिक जखमी झाले. जीप उलटताच नागरिकांनी धाव घेतली. माहिती मिळताच नरखेड पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व श्रमिकांना नागपुरातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी गंभीर अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




