उमरेडमध्ये २६ जानेवारीला शिकवणी वर्गात देण्यात आलेला रसायनशास्त्राचा पेपर तीन वर्षांपूर्वीच सेट करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाने केलेल्या तपासात समोर आली आहे.
उमरेड पेपरफूट प्रकरणात एसआयटीने निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे व ‘टार्गेट’ या शिकवणी वर्गाचे संचालक अतुल जगन चौधरी या दोघांना अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात असल्याची माहिती आहे.
एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता २०२३मध्ये खर्चे तसेच कोल्हापूर व लातूरमधील प्राध्यापकांनी रसायनशास्त्राचा पेपर सेट केला. हा पेपर मार्च व ऑक्टोबर २०२३मध्ये परीक्षेला आला नाही. त्यानंतर पुढील वर्षी मार्च व ऑक्टोबर २०२४ व मार्च व ऑक्टोबर २०२५ मध्येही तो परीक्षेला आला नाही. त्यामुळे तीन वर्षांआधी सेट केलेला हा पेपर मार्च २०२६ च्या बारावीच्या परीक्षेत नक्कीच येईल, अशी खात्री खर्चे याला होती. त्यानेच चौधरी याला हा पेपर दिला. या बदल्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचीही शक्यता आहे. खर्चे याने पेपर फोडून गोपनीयतेचा भंग केल्याचेही तपासात समोर आले आहे. एका पेपरसेटरचे बयाण नोंदविल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.




